तरुणांनो खुशखबर ! ठाकरे सरकारची एक लाख एक हजार पदांची मेगाभरती
तरुणांनो खुशखबर ! ठाकरे
सरकारची एक लाख एक हजार
पदांची मेगाभरती
अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार
फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार पदांच्या मेगाभरतीत आणखी 29 हजार पदांची वाढ होणार आहे. दोन लाख रिक्त पदांपैकी 50 टक्के पदांच्या भरतीचा निर्णय वित्त विभागाने घेतला. त्यानुसार शासकीय विभागांमधील रिक्त पदांची माहिती नव्याने संकलित करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातर्फे युध्दपातळीवर सुरु आहे. मात्र, भरती प्रक्रियेसाठी खासगी एजन्सी नियुक्ती झाल्यानंतरच मेगाभरतीला सुरुवात होईल, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापरीक्षा पोर्टल बंद केल्यानंतर आता महाआयटीच्या नियंत्रणात खासगी एजन्सीद्वारे मेगाभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. पारदर्शक भरतीसाठी आयटी कंपन्यांमधील पदांची भरती करणाऱ्या सक्षम अशा संस्थेची नियुक्ती केली जाईल, असे महाआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, शासनाच्या आठ विभागांसाठी महापरीक्षा पोर्टलकडे नोंदणी केलेल्या 34 लाख 83 हजार विद्यार्थ्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाला सुपूर्द केला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मेगाभरतीत आता आरोग्य, शिक्षण, महसूल, गृह, कृषी, पशुसंवर्धन विभागांमधील पदांची वाढ झाली आहे. वर्ग- एक व वर्ग- दोनच्या अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत तर वर्ग- तीन व चारच्या पदांची भरती खासगी एजन्सीद्वारे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अडीच महिन्यांत मेगाभरतीला सुरवात होणार असून दिवाळीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे नियोजन आहे.