मार्चमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून ऑनलाईन प्रवेशपत्र (हॉलतिकीट) मिळेल. माध्यमिक शाळांमार्फत प्रवेशपत्रांचे वाटप केले जाईल. संबंधित विद्यार्थ्यांना शाळांमार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र दिली जाणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळाववरील ‘स्कुल लॉगीन’मधून शाळांना प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.
दहावी आणि बारावीची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांसाठीचे हॉलतिकीट हे सर्व विभागीय मंडळांना आतापर्यंत विभागामार्फत पुरविले जात होते, मात्र यापुढे विद्यार्थ्यांना ते ऑनलाइन देण्यात येईल. मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार, विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालांनी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना, विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. हॉलतिकीटची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. हॉलतिकिटामध्ये विषय व माध्यम बदल असेल, तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे कराव्या लागतील. हॉलतिकिटावरील फोटो, स्वाक्षरी, जन्मतारीख, विद्यार्थ्याचे नाव आदी दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयीन स्तरावर करून त्यांची एक प्रत त्यांना विभागीय मंडळाला पाठवावी लागेल. हॉलतिकिटे मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होतील.
गहाळ झाल्यास मिळणार दुसरी प्रत हॉलतिकीट विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा, महाविद्यालयांनी पुन्हा त्याची प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यावे. फोटो चुकल्यास नवा फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारून सही करावी, अशा सूचना शाळा - महाविद्यालयांना दिल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.